सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्थापना :-

     छत्रपती शिवाजी महाराज , राजर्षी शाहू महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या या थोर समाजसुधारकांनी समता , न्याय , बंधुता यांची शिकवण देत समाज घटकांच्या विकासासाठी आपले अवघे आयुष्य खर्ची घातले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका , संघटित व्हा , संघर्ष करा यांची शिकवण देऊन एक नवा समाज घडवला. अनुसूचित जाती मधील घटकांना समान संधी , न्याय आणि हक्क मिळावा आणि त्यांचे शोषण होऊ नये याकरिता शासन निर्णय क्रमांक 4370 दिनांक 5 नोव्हेंबर 1928 अन्वये स्टार्ट समितीची स्थापना करण्यात आली. सदर ‍समितीमध्ये एकूण 10 सदस्यांचा समावेश होता. सदर समितीमध्ये . बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. समितीचा अहवाल 1930 साली शासनास सादर करण्यात आला. मागास समाजासाठी 1932 साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना करण्यात आली. श्री. ओ.एच.बी. स्टार्ट, आय.सी.एस. खात्याचे पहिले संचालक होते. 1947 साली संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचे कार्यालय मुंबई येथून पुणे येथे स्थलांतरित करण्यात आले. मा. श्री. गणपती देवजी तपासे, मंत्री उद्योग, मत्सव्यवसाय आणि मागावर्गीयांचे कल्याण यांच्या हस्ते दिनांक 09.08.1947 रोजी पुणे येथील संचालनालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.

     शासन निर्णय क्रमांक बीसीई- 2857 डी दिनांक 23 सप्टेंबर 1957 अन्वये मुख्य निरिक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रिकरण करुन समाज कल्याण संचालनालयाची स्थापना. समाज कल्याण विभागाची निर्मिती होऊन शिक्षण व समाज कल्याण अशी विभागणी मार्च 1972 मध्ये झाली. समाज कल्याण, सांस्कृतीक कार्य क्रिडा व पर्यटन विभाग असे नामकरण सन 1983 मध्ये करण्यात आले. मार्च 1999 मध्ये समाज कल्याण विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग अशी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली. फेब्रुवारी 2001 मध्ये समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाचे नाव सामाजिक न्याय , सांस्कृतिक कार्य, क्रिडा विभाग असे करण्यात आले.  समाज कल्याण संचालनालय म्हणजेच आजचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग होय.आज राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सामाजिक न्याय विभागाचे कार्य विस्तारलेले आहे

     समता , न्याय , एकात्मता या विचारांवर आधारित महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. हा विभाग समाजातील अनुसूचित जाती-जमाती , नवबौद्ध आणि मागासवर्गीय घटकांसाठी काम करतो. अनुसूचित जाती-जमाती , नवबौद्ध आणि मागासवर्गीय हे आपल्या समाज घटकाचाच एक भाग आहे. सर्वसाधारण घटकाप्रमाणेच या घटकाची ख्याती ही जगभर पसरलेली आहे. स्वबळावर आणि कठोर प्रयत्नाने जगातल्या प्रत्येक क्षेत्रात आपले नावलौकिक केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने अनेक विविध योजना , अर्थसहाय्य , प्रकल्प यांचा पाठपुरावा करून समाजाने दुर्लक्षित केलेल्या या घटकाला समाजात मानाचे स्थान , त्यांचे हक्क आणि स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे. आणि म्हणूनच आज हा समाज या विभागाची कास धरत जगाच्या पाठीवर आपलं नाव गाजवतो आहे.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संक्षिप्त माहिती

राज्य

महाराष्ट्र

विभाग

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

उद्देश

अनुसूचित जाती घटकाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आणि शासनाच्या विविध योजना राबविणे.

लाभार्थी

अनुसूचित जाती

अधिकृत संकेतस्थळ

www.sjsa.maharashtra.gov.in

https://socialjusticelatur.com

 

योजनांचे विभाजन

१) शैक्षणिक विकासाच्या योजना २) आर्थिक विकासाचा योजना ३) सामाजिक विकासाच्या योजना
या योजना आणि उपक्रम सामाजिक न्याय विभाग संपुर्ण राज्यभर राबवित आहे व प्रत्यक्षात त्याचा लाभ अनुसूचित जाती घटकांना मिळवून देत आहे.